Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, December 8, 2018

...आणि सुरेंद्र भाटिया यांची निवड झाली

...आणि सुरेंद्र भाटिया यांची निवड झाली

चित्रपटसृष्टीमध्ये डबिंग आर्टिस्ट हा स्वतंत्र कलाप्रकार आहे. चित्रपट, जाहिराती यांच्यासाठी प्रामुख्याने या डबिंग आर्टिस्ट्चे सहकार्य लाभत असते. परंतु आता कार्टून,  भाषांतरित चित्रपट, मालिका यांची निर्मिती अधिक होत असल्याने डबिंग आर्टिस्ट्चे काम हे वाढलेले आहे. आंतरराष्ट्रीय निर्मितीच्या मालिकेसाठी भारतातील कलाकारांची निवड केली जाते, तेव्हा त्यांचे आवर्जून कौतुक होते. लंडनबरोबर जगभर ज्यांना ‘व्हॉईस ऑफ गॉड’ म्हणून ओळखले जाते ते अभिनेते डेव्हिड अटेन्बरो यांच्यासाठी भारतीय आवाजाची गरज होती. अर्थ बीबीसी या वाहिनीवरील ‘प्लॅनेट’ या मालिकेसाठी भारतातल्या कलाकारांची ऑडिशन घेतली त्यात सुरेंद्र भाटीया यांची निवड केलेली आहे. योगायोग म्हणजे ‘जुरासिक पार्क’ या गाजलेल्या हॉलिवूडपटासाठी सुरेंद्र भाटिया यांनी सर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्यासाठी डबिंग केलेले आहे. गेल्या छत्तीस वर्षांच्या प्रवासात असा योग पुन्हा आल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांची नोंद घेतली जाते पण डबिंग आर्टिस्टची अजूनही सरकारी दरबारी नोंद घेतली जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.      
Share:

नटखट, सच्चा रंगकर्मी मोहन जोशी

नटखट, सच्चा रंगकर्मी  मोहन जोशी

बहुचर्चित ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट 7 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आज जे ‘मी टू’ प्रकरण सर्वत्र गाजते आहे, त्या प्रकरणावर हा चित्रपट आधारलेला आहे. श्रीसिद्धी गणेश फिल्म्स्च्यावतीने या चित्रपटाची निर्मिती केली असून ज्ञानदेव राजाराम शेटे हे त्याचे प्रस्तूतकर्ते आहेत. नितीन शेटे, ज्ञानेश्वर ढोके यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश चव्हाण याने केलेले आहे. अलका कुबल-आठल्ये, अविनाश नारकर, पल्लवी सुभाष, आशालता वाबगावकर, रविंद्र बेर्डे, शितल शुक्ल, विजय पटवर्धन, प्रिती जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत मोहन जोशी यांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हिंदीतल्या भूकंप ते मराठीतल्या होम स्वीट होम पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मोहन जोशी यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत. नाट्यप्रवासाच्या बाबतीतही हेच सांगता येईल. त्यांच्या सर्वच भूमिकांची प्रेक्षकांनी प्रशंसा केलेली आहे आणि आता तर नटसम्राट या नाटकामुळे त्यांचा प्रेक्षकवर्ग हा अधिक वाढलेला आहे. रंगमंचावरच्या या नटाला रूपेरी पडद्यावरही विविध भूमिका करण्याचा मान मिळालेला आहे. विषयाने, नवीन तंत्राने, श्रवणीय संगीताने हाताळलेला हा चित्रपट जसा प्रेक्षकांना कायम स्मरणात राहिल तस वैविध्यपूर्ण भूमिकेमुळे मोहन जोशी यांची भूमिकाही कायम लक्षात राहणारी होणार आहे. ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटामध्ये मोहन जोशी यांनी अविनाश कर्णिकची व्यक्तिरेखा साकारलेली आहे जो मुळात एक रंगकर्मी आहे. आपल्या अभिनयाने स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग त्याने निर्माण केलेला आहे. संसारापेक्षा नाटकात विविध भूमिका करायला मिळाव्यात याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी रंगभूमीवर ज्या अजरामर व्यक्तीरेखा होऊन गेल्या अशा एक दोन नव्हे तर पाच वेगवेगळ्या भूमिका नाट्यकलावंत या नात्याने ते पडद्यावर साकार करणार आहेत. किंग लिअर, अ‍ॅथेल्लो, हॅम्लेट, मॅकबेथ, नाना फडणवीस यांच्या भूमिका साकारताना ते पडद्यावर दिसणार आहेत. मोहन जोशी यांच्या वाट्याला जे चित्रपट आले त्यात ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटाविषयी अधिक आत्मियता वाटते आहे, त्याला कारण म्हणजे एका कलावंताला जागतिक कीर्तीच्या अनेक भूमिका साकारायला मिळाव्यात याचे त्यांना अप्रूप वाटते. अशोक पत्की यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. मराठी कलाविश्वातील दोन दिग्गजांच्या वैविध्यपूर्ण सामर्थ्याने सजलेली ही काव्यमैफिल प्रथमच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आरती प्रभू यांच्या गीतांचा यात समावेश आहे. सुरेश वाडकर, देवकी पंडीत, महालक्ष्मी अय्यर यांचा स्वर या गीतांना लाभलेला आहे.
Share:

जयंत सावरकरांच्या इच्छेनुसार

जयंत सावरकरांच्या इच्छेनुसार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाबद्दल राजकर्त्या नेत्यांना नेहमीच कुतूहल राहिलेले आहे. मंत्रीमंडळात जे महत्त्वाचे विभाग आहेत, त्यात सांस्कृतिक विभाग आपल्या हाती लागावा असा बर्‍याच जणांचा प्रयत्न असतो. योगायोग म्हणजे या विभागासाठी ज्या ज्या मंत्र्यांनी खाते सांभाळले त्यांना भविष्यात मंत्री होता आलेले आहे. सुशिलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण अशी काहीशी नावे घेता येतील. या विभागाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. उपेक्षीत कलाकारापासून तर ते अगदी सेलिब्रिटी कलाकारांपर्यंत सर्वचजण या खात्याशी संपर्क ठेवून असतात. मंत्री, सचिव यांच्याबरोबर सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक यांनासुद्धा मानाचे स्थान असते. प्रतिष्ठेच्या वेगवेगळ्या सोहळ्यात त्यांनाही हजेरी लावता येते. पूर्वी मंत्रीमंडळ असेपर्यंत संचालक हा कायमस्वरूपी राहत होता. पण आता दीड-दोन वर्षातच काहींची उचलबांगडी होण्याची उदाहरणे अधिक ऐकायला मिळतात. इथे येणारा प्रत्येक संचालक आपल्या पद्धतीने कार्यप्रणाली राबवत असतो. सध्या स्वाती काळे या संचालनालयाच्या संचालक आहेत. संचालनालयाच्यावतीने अठ्ठावन्नवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा महाराष्ट्राच्या विविध विभागात सुरू आहे. त्याचे नेतृत्त्व स्वत: काळे करित आहेत. एकीकडे शासनाच्यावतीने व्यावसायिक नाटकांना जे अनुदान दिले जाते त्यावरही त्यांची नजर आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘अगं ऐकलस का’ या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे होता. या नाटकात फारसे नावाजलेले कलाकार नसतानासुद्धा निरिक्षण समितीबरोबर त्यांनीही नाटकाचा आनंद घेतला. अल्प कालावधीमध्ये संचालक या नात्याने जी भ्रमंती झाली त्यात त्यांनी हौशी कलाकारांसाठी शासनाच्यावतीने प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवलेली आहे. शासनाच्यावतीने रंगभूमीसाठी योगदान देणार्‍या कलाकाराला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तो सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. बर्‍याचवेळा पुरस्कार सोहळा हा रविंद्र नाट्यमंदिर, यशवंत नाट्यगृह इथल्या प्रशस्त जागेत आयोजित केला जातो. यंदा मात्र केवळ सावरकर यांच्या सांगण्यावरून गिरगावच्या साहित्य संघात तो सोहळा पार पडणार आहे. इथे वाहतुकीची कोंडी, नेपथ्य साहित्य, तांत्रिक सुविधा हाताळणे केवळ चिंचोळी जागा असल्यामुळे अवघड जाते. अस असताना हा सोहळा इथे पार पडणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. सावरकरांची खर्‍या अर्थाने ही कर्मभूमी आहे. या रंगभूमीने त्यांच्यातल्या कलाकाराला घडवले. मान-सन्मान-प्रतिष्ठा मिळवून दिली. ते ऋण या पुरस्काराच्या निमिताने फेडले जावेत हा त्यापाठीमागचा मूळ उद्देश आहे. संचालक काळे यांच्या शासकीय जबाबदारीत तो पार पडणार आहे. 
Share:

जुगलबंदीने नटलेली मैफिल

जुगलबंदीने नटलेली मैफिल

पूर्वी नाट्यसंगीत, दशावतार, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, तमाशा रात्रभर होत होते. पुढे प्रेक्षकांच्या व्यस्ततेप्रमाणे याच कार्यक्रमांना मर्यादा आल्या. इतक्या मार्यादा आल्या की आता पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले तर प्रेक्षक येऊ शकतील का असा प्रश्न निर्माण झाला. गोवा अकादमीने सलग तीन दिवस-तीन रात्र ‘काव्यहोत्र’ हा उपक्रम राबविला. विसुभाऊ बापट यांनीसुद्धा दिवसरात्र ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्याहीपुढे अखिल भारतीय नाट्य परिषदेने मुलुंड येथे झालेल्या नाट्यसंमेलनात दिवसरात्र अशा साठ तासांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अलीकडे भल्या पहाटे होणार्‍या दिवाळी पहाटलाही प्रेक्षक उत्स्फुर्तपणे दाद देतात म्हंटल्यानंतर अन्य अयोजकांनी अशा कार्यक्रमात रस घेणे सुरू केलेले आहे. खरतर भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा लक्षात घेतली तर संध्याकाळपेक्षा सकाळीच कार्यक्रमांचे आयोजन हे केले जात होते. ‘आठ प्रहर’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तोच अनुभव मुंबईकरांना घेता येणार आहे. चोवीस तासांपैकी वीस तास हे ‘आठ प्रहर’ साठी गृहीत धरलेले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते दुसर्‍या दिवशी तीन वाजेपर्यंत ही शास्त्रीय संगीताची मैफल रंगणार आहे. त्यासाठी जगभरातील सोळा दिग्गज गायकांची जुगलबंदी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. ही आगळीवेगळी मैफल आयोजित करण्यासाठी ‘आर्ट आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट्’च्या संस्थापिका व संचालिका दुर्गा जसराज यांनी पुढाकार घेतलेला आहे. शनिवार 8 डिसेंबर षण्मुखानंद या ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम सकाळी सहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत होणार आहे. जसराज कुटुंबियांचे शास्त्रीय संगीतातील योगदान हे अनेक वर्षांचे आहे. स्वत: दुर्गा जसराज यांनी होणार्‍या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे बदल अनुभवलेले आहेत. त्यांच्या लहानपणी प्रत्येक प्रहरी संगीताचे कार्यक्रम होत होते, तो एकत्रितपणे आजच्या प्रेक्षकांना अनुभवता यावा या एका हेतुने ‘आठ प्रहर’ या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सोळा कलाकार विविध रागांचे दर्शन यावेळी घडवणार आहेत. ‘पंचम निषाद’ या संस्थेनेसुद्धा या कामी सहकार्य दर्शवलेले आहे. ठरावीक वेळी योग्य राग आळवला जावा यासाठी कार्यक्रमाची विभागणी केलेली आहे. पहिल्या सत्रात शाहीद परवेझ, संजीव अभ्यंकर, राजन आणि साजन मिश्रा, सतीश व्यास, रूपक कुलकर्णी, जयतीर्थ मेवूंडी, प्रवीण गोडखिंडी यांचा समावेश असेल. तर दुसर्‍या सत्रात देवाशीष भट्टाचार्य, मिलिंद रायकर, सावनी शेंडे, शहास्वाती मंडळ,  राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, रशीद खान आणि शुजात खान हे सहभागी होणार आहेत. गाण्याबरोबर शास्त्रीय वाद्यही वाजवली जाणार आहेत. विशेष करून बासरी, व्हॉयोलीन, संतूर, सतार आणि स्लाईड गीटार या वाद्यातून राग प्रकट केले जाणार आहेत. प्रहरानुसार रागसौंदर्याचा अनुभव प्रेक्षकांना, श्रोत्यांना घेता येईल. सूर्यादय ते सूर्यस्त असा हा कार्यक्रम असणार आहे.
Share:

‘गलती से मिस्टेक’ ध ध धमाल


कलारंजना’ आणि ‘दिशा’ या नाट्यसंस्थांच्यावतीने उदय साटम, प्रिया पाटील यांनी ‘गलती से मिस्टेक’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. वैभव परब हा या नाटकाचा लेखक असून अभिनेता संजय खापरे याने या नाटकाचे दिग्दर्शन केलेले आहे. आशिष पवार याच्याबरोबर त्यानेसुद्धा यात मुख्य भूमिका निभावलेली आहे. चेतना भट हिचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.‘गलती से मिस्टेक’ बोले तो हटके मनोरंजन.
गुलाब ही सज्जन वालावलकरांची कन्या. तिचे छगन नावाच्या गुजराती मुलाबरोबर प्रेम जमलेले आहे. लग्नासाठी त्याने काही चैनीच्या वस्तू गुलाबकडे मागितलेल्या आहेत. त्या दिल्या की छगन आपल्याशी विवाहबद्ध होईल असे तिला वाटते. त्यासाठी ती वडिलांकडे तगादा लावत असते. वडील कंजूष वृत्तीचे असतात. अशा स्थितीत स्टोव्हपीन नामक चोर त्यांच्या घरात शिरतो. तो चोरी करत नाही पण वालावलकरांच्या हाती लागतो. छगनला ज्या चैनीच्या वस्तू हव्या आहेत त्या या सराईत चोराकडून मिळवायच्या आणि मुलीचे लग्न उरकायचे अशी कल्पना वालावलकरांच्या मनात येते. मुलगी- वडील या चोराबरोबर सेल्फी काढतात आणि त्याचा धाक दाखवून चोरीसाठी वेगवेगळ्या युक्त्या सुचवतता. स्टोव्हपीन केवळ सुटका व्हावी म्हणून सगळ्या गोष्टी करण्याची तयारी दाखवतो. या दरम्यान गुलाब त्याला आवडते. तिच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो तर तिच्या निर्णयात बदल होऊन ती आपल्याबरोबर लग्न करेल असे त्याला वाटत असते. पण प्रत्यक्षात तसे काही घडत नाही. प्रत्यक्षात ज्या काही गोष्टी कानावर येतात त्या धक्का देणार्‍या असतात. नाटक विनोदी आहे, भरपूर मनोरंजन करणारे आहे. त्यात रहस्य आहे, मनमुराद हसवताना पुढे काय घडणार आहे याचा शोधही घेण्यास नाटक प्रेक्षकांना भाग पाडते.
वैभव परब हा या नाटकाचा लेखक आहे. विनोद आणि रहस्य यांची कथासूत्रात बांधणी करताना बर्‍याचवेळा कथासूत्रात अनेक उपकथांचा समावेश करत नाटक गुंतागुंतीचे केले जाते. असे नाटक पहाताना प्रेक्षकांना सतर्क रहावे लागते. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात उत्कंठा आहे आणि साध्यासरळ रचनेतून कथा सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे करत असताना प्रेक्षकांना अपेक्षीत असलेले संगीत, नृत्य कसे येईल हे लेखकाने पाहिलेले आहे. हे जरी खरे असले तरी लेखकाने जे ठरवले आहे ते दिग्दर्शनात बांधणे बर्‍याचवेळा अडचणीचे जाते. संजय खापरे हा मूळातच अभिनेता आहे. अनेक विनोदी नाटकात काम करुन विनोदाबद्दलची असलेली समज त्याने भूमिकेतून दाखवून दिलेली आहे. दिग्दर्शनात त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. अभिनयाइतकाच आवाजातील चढ-उतार, देहबोली, शब्दांशिवायच्या बारिकसारिक हालचाली सर्वच पात्रांकडून करुन घेतलेल्या आहेत. त्याने स्वत: यात सज्जन वालावलकर ही व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. जबाबदार पण तेवढाच काटकसरी बाप अशी ही भूमिका आहे. ठरावीक वय झाल्यानंतर माणसाच्या काही लकबी असतात त्यांचे सातत्य त्याने भूमिकेत ठेवलेले आहे. स्टोव्हपीनची व्यक्तीरेखा आशिष पवार याने केलेली आहे. संजय इतकाच तोही या नाटकात धमाल करतो. कितीतरी असे प्रसंग आहेत की ज्यात ठरावीक अशा शब्दांचा पुनरुच्चार झालेला आहे. प्रेक्षक या नाटकात इतके सहभागी होतात की हास्याबरोबर टाळ्यातर येतातच परंतु एकत्रितपणे पुनरुच्चार केले जाणारे शब्द प्रेक्षकांकडूनच येऊ लागतात. हे नाटक अधिक रंजक होण्याला कारण म्हणजे संजय, आशिष हे दोघेही विनोदाची समज असलेले कलाकार आहेत. काय केले म्हणजे प्रेक्षकांचा लाफ्टर मिळेल याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केलेला आहे. संपूर्ण नाटकात त्याचा प्रत्यय येतो. गुलाबची व्यक्तीरेखा चेतना भट या युवतीने केलेली आहे. 
अभिनयाइतकीच ती नृत्यातही सराईत आहे. प्रेक्षकांना संगीत आणि नृत्याचा छान आनंद घेता येतो. गाजलेल्या गाण्यांवर मंदार चोळकर याने आपले शब्द पेरलेले आहेत. त्याचे संगीत संयोजन अमीर हडकर याने केलेले आहे. त्यांचे हे संगीत कथानकाला साजेल असे असले तरी सगळ्यात नव्या प्रयत्नात हा संगीताचाही प्रयत्न नव्याने झाला असता तर अधिक चांगले झाले असते. सिद्धेश दळवी याने नाटकात छोट्या भूमिकेबरोबर नृत्यदिग्दर्शनाचीही बाजू सांभाळलेली आहे. प्रवीण भोसले यांनी आपल्या नेपथ्यात बारीकसारीक तपशील दाखवलेला आहे हे नाटक पहाताना जाणवते. 
Share:

पेण दुय्यम निबंधक कार्यालयाला दलालांचा विळखा

पेण दुय्यम निबंधक कार्यालयाला दलालांचा विळखा

 पेण । प्रतिनिधी
पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला दलालांनी विळखा घातला असून सर्व सामान्य माणसाची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी -विक्री दस्तऐवज नोंदणी, गहाण खत नोंदणी, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नि आदी विविध कामे करण्यासाठी सर्वसामान्य माणूस गेला असता त्याला त्याच्या दस्तऐवजमध्ये विविध त्रुटी असल्याचे कारण देण्यात येते, अथवा इंटरनेट नेटवर्क नसल्याने ऑनलाईन दस्त नोंदणी होणार नसल्याचे हे नेहमीचे कारण देऊन वाटेला लावले जाते. 
दुय्यम निबंधक कार्यालयात होणार्‍या या छळवणूकीला कंटाळून सर्वसामान्य माणूस आपोआपच या कार्यालया बाहेर असलेल्या दलालांचा रस्ता धरतो व येथे सावजाच्या शोधात दबा धरुन बसलेल्या दलालाच्या हाती सर्वसामान्य माणूस सापडतो. त्याला नोंदणी फी, इतर शासकीय फी, या बरोबरच रजिस्टर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना टेबल खालून द्यावी लागणारी रक्कम इतर अनेक चार्जेस लावून त्याचा खिसा कापण्यात येतो. या दलालांना काम दिल्यास कोणतीच अडचण न येता त्वरित काम होत असल्याने अनेक जण या दलालाच्या माध्यमातून आपली कामे करण्यात धन्यता मानतात. यामुळे रजिस्टर कार्यालयातील अधिकारी व दलाल यांचे मात्र चांगलेच फावत आहे.
Share:

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाडमध्ये विकासकामे सुरू

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाडमध्ये विकासकामे सुरू
  
ठाणे । प्रतिनिधी
 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात विकासकामांना वेगात सुरुवात झाली असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते गुरुवारी विविध विकासकामांची उद्घाटने करण्यात आली.
तालुक्यातील पिंपळगाव जोड रस्त्याचे डांबरीकरण, शिवळे - कोंडेसाखरे जोड रस्ता डांबरीकरण, शिवळे जोड रस्ता डांबरीकरण तसेच कोंडेसाखरे येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन वर्गखोली, पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती, जिल्हा परिषदेच्या पवाळे येथील शाळेत दोन नव्या खोल्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोस्टे, पांडुरंग कोर, पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, बळीराम आगिवले, अशोक पाटोळे, भाऊराव पवार, रवींद्र पवार, रघुनाथ पवार, जयराम पगार, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
मुरबाड तालुक्याच्या विकासाला आपण व राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात टप्प्याटप्प्यात विकासकामे राबविण्यात येतील, अशी माहिती सुभाष पवार यांनी दिली.
Share:

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support