Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

घे घे रे सायबा..

कुठल्याही चांगल्या योजनेच्या नरडीला नख कसं लावायचं ते आपल्या राज्यातील विरोधी पक्षांना विचारा. आणि शिवसेनेलाही विचारा. शिवसेना सरकारमध्ये असली तरी बहुत्करून सरकारच्या विरोधातच बोलत असते म्हणून विरोधी पक्षाची भूमिकाच पार पाडत असते. त्यामुळे शिवसेनाही आलीच विरोधी पक्षांमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू, अंतर्गत गोटातले वगैरे म्हणतात त्या प्रकारचे अबकारी खात्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी, यापुढे घरपोच दारू देण्याचा सरकारचा विचार आहे.. एवढे म्हणण्याचा अवकाश की झालाच या विरोधी पक्षांचा गदारोळ सुरू. दारू उद्योगासाठी गेमचेंजर, अभूतपूर्व अशी ही सुपिक कल्पना ज्याच्या डोक्यातून निघाली त्याचे अभिनंदन करायचे सोडून विरोधी पक्षांनी या योजनेच्याच चिंधड्या उडवल्या. इतक्या चिंधड्या की त्या देखील चकन्यासाठी टेबलवर आलेले शेंगदाणे खाली पडल्यावर कसे दिसत नाहीत तशा चिंधड्या उडून ही मूळ योजनाच दिसेनाशी झाली. बावनकुळे यांनी केवळ या योजनेची कल्पना मांडली होती पण, सरकारला ती घाईघाईत गुंडाळून ठेवावी लागली. खुद्द मुख्यमंत्र्यांना, असा काही प्रस्ताव नाही, अशी कुठली योजनाच नाही, असा खुलासा काही तासांत करावा लागला. फडणवीस यांच्या या घुमजावमुळे बावनकुळेंना यामुळे जेवढे वाईट वाटले असेल त्यापेक्षा कितीतरी वाईट राज्यातील लाखो मद्यप्रेमींना वाटले असणार हे नक्की. बावनकुळे आधी मद्यउद्योगासाठी ही योजना गेमचेंजर असल्याचे म्हणाले होते. नंतर, आणखी स्पष्टीकरण देताना, त्यांनी मद्यप्राशनामुळे होणार्‍या वाढत्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त करून हे अपघात टाळण्यासाठीच घरपोच दारू देण्याचा सरकार विचार करत आहे, असे सुतोवाच केले होते. सगळ्या उद्योगावर, त्यांच्या कष्टांवर फडणवीस यांना पाणी फेरावे लागले ते केवळ अज्ञ विरोधकांमुळे. बिअर किंवा सोडा कसा ग्लासात भस्सकन ओतल्यावर फसफसून येत ग्लासाबाहेर ओसंडून फुकट जातो तसे बावनकुळेंच्या उत्साहाचे झाले असणार. एवढी चांगली योजना सुरु व्हायच्या आधीच ग्लासाबाहेर फसफसून वाया गेली. किती उदात्त विचारांनी ही योजना प्रेरित होती, लोकांच्या सुरक्षेचा, वाढते अपराध रोखण्याचा आणि त्याचबरोबर मद्यप्रेमींचा आनंद कायम राहावा असे विचार बावनकुळेंनी नक्कीच केले असावेत. मद्यप्रेमींना ग्लासात बर्फाचा एखादा खडा जास्त पडलेला आवडत नाही किंवा ज्याला साधे पाणी हवे असते त्याला सोडा मिक्स नको असतो तसेच काहीसे ही योजना सरकारने मागे घेतल्यावर पट्टीच्या मद्यप्रेमींना वाटले असावे. बावनकुळेंनी एकाच ग्लासात किती समाजपयोगी बाबींचे कॉकटेल जमवून आणले होते याची कल्पना विरोधकांना कशी येणार? अपघात टळावेत, लोकांना घरच्या घऱी, वेळच्या वेळी मद्य मिळावे, बाहेर मद्यप्राशन केल्यावर होणारे तमाशे, भांडणं, मारामार्‍या होऊ नयेत, झालंच तर मतदानापूर्वी पार्टी मागणार्‍या लोकांनी खुश होऊन घरपोच मद्य देणार्‍या पार्टीलाच मते द्यावीत, असे कितीतरी संकल्पांचे हे कॉकटेल होते. मेक इन इंडिया उपक्रमातील रोजगारवाढीचे कितीतरी मोठे लक्ष्य या योजनेमुळे राज्यात गाठले गेले असते. ऑनलाईन नोंदवलेल्या मागणीनुसार घरी मद्य पुरवायचे या संकल्पनेसाठी नव्या वेबसाईट तयार झाल्या असत्या, आयटी वाल्यांना काम मिळाले असते, डिजिटल व्यवहारांमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली असती, वेबसाईटवर नोंदवलेल्या मागणीनुसार गोदामातून बाटली काढायला आणि पोहोचवायला कर्मचारी वर्ग लागला असता, त्यांना मोटारसायकली वगैरे द्याव्या लागल्या असत्या. हे सारे संभाव्य रोजगार विरोधी पक्षांनी नाहिसे केले आहेत. लव्ह पेगचा शेवटचा थेंबही कधी कधी मिळत नाही तसेच या योजनेच्या प्रकट-अप्रकट उद्दीष्टांपैकी एकही विरोधकांच्या आडमुठेपणामुळे आता साध्य होणार नाही, प्रत्यक्षात येणार नाही. जनतेच्या भल्यासाठी, तळागाळातल्या शेवटच्या माणसासाठी सरकार काही करू पाहात होते तर ते श्रेयही विरोधी पक्षांनी आपल्या सरकारला मिळू दिलेले नाही. विरोधकांचा हा विघ्नसंतोषीपणा त्यांना निवडणुकांत भोवणार आहे. ज्यांच्या सुकलेल्या घशांमध्ये त्यांनी मद्याचे घरपोच थेंब पडू दिलेले नाहीत त्यांची मते विरोधी पक्षांना मिळण्याची आता सुतराम शक्यता नाही. अलिकडे अनेक गावांमध्ये बाटली आडवी अर्थात दारूविक्री केंद्रे, गुत्ते बंद पाडण्याचे ठराव होतात. दारूबंदी होते. ही दारूबंदी अमलात आणणारे सरकारच ही मद्यसेवा देऊ पाहात होते. धुम्रपानाला मनाई करायची आणि त्याचवेळी सिगारेट कंपन्यांकडून भरघोस कर वसूल करून जनतेच्या कल्याणासाठी उत्पन्नात भर घालायची अशीच ही दुहेरी जनसेवा. पण, दुष्काळग्रस्तांना आधी मदत द्या, म्हणत विरोधकांनी एक चांगली योजना हाणून पाडली आहे. ऑनलाईन मद्यसेवा यशस्वी झाली असती तर त्याच ऑनलाईन सेवेद्वारे दुष्काळग्रस्तांनाही मदत धाडता आली असती. हा उद्देशही विरोधकांनी लक्षात घेतलेला नाही. हे दुर्दैवच.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support