Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 31, 2018

राम मंदिरासाठी नुरा कुस्ती

कुस्तीच्या आखाड्यातही कधी कधी लुटुपुटीच्या कुस्ती खेळवल्या जातात, गावागावांतील जत्रांतही असे सामने रंगतात.   त्याबद्दल एक भारी शब्द गावाकडे ऐकला होता. नारळासाठी कुस्ती. म्हणजे नारळ मिळतो, कुस्ती खेळल्याचा मान मिळतो म्हणून उगा आपले दंड थोपटून मातीत फिरून यायचं. समोरचा प्रतिस्पर्धी आला की नांगी टाकायची. अशा नाटकी खडाखडींना नुरा कुस्ती म्हणायचे पूर्वी. निवडणुका जवळ आल्या की निवडणुकांच्या आखाड्यातही नुरा कुस्ती सुरू होते. जशी आता भाजपा आणि एमआयएममध्ये सुरू झाली आहे. भाजपा आणि संघ स्वत:ला हिंदुंचे एकमेव कैवारी समजतात, शिवसेना त्यातही वाटेकरी आहेच आणि इकडे एमआयएमचे ओवेसी बंधू मुस्लिमांचे तारणहार म्हणून मिरवतात. अयोध्या आणि राम मंदिर प्रकरणावरून आता निवडणुकीपर्यंत पद्धतशीर वातावरण तापवत नेले जाणार आहे. त्याची पूर्वतयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहेच. एखादी धार्मिक दंगल वगैरे भडकवून, पाचपन्नास बळी घेऊन हिंदुत्ववादी आणि मुस्लिमांचे स्वयंघोषित संरक्षक त्या विद्वेषाच्या आगीवर त्यांच्या स्वार्थाची खरपूस पोळी भाजून घेतील हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंची पावले तशीच पडू लागली आहेत. विशेषत: रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सबुरीचा सल्ला देत पुढच्या सुनावणीसाठी जानेवारी महिना मुक्रर केल्यावर तर दंड थोपटण्याला, शड्डू ठोकण्याला कमालीचा जोर आला आहे. संघ आणि हिंदुत्ववादी संघटना आता एकदम केंद्र सरकारने राम मंदिराबाबत कायदाच करावा असे म्हणू लागल्या असून, तिकडे असदुद्दीन ओवेसीने, राम मंदिरासाठी अध्यादेश आणून दाखवाच असे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. मोदी अर्थातच नेहमीप्रमाणे मौनात आहेत. देशापुढील सर्व प्रश्न, समस्या, कष्टकरांच्या वेदना-व्यथांचे संपूर्णपणे निराकरण झाले असून जणू रामराज्यच अवतरले आहे आणि राम मंदिराची उभारणी हा एकमेव प्रश्नच आता शिल्लक उरला आहे असे काहीतरी वेडगळ जनतेच्या मनात रुजवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राजकारण्यांना, राजकीय पक्षांना निवडणुकांच्या दृष्टीने ते सोयीचे आहे. कारण भावनांचे निखारे प्रदीप्त करूनच आजवर आपल्याकडे बहुतेक निवडणुकांमध्ये मतांची बेगमी, ध्रुवीकरण झाले आहे. यात कोण मेले, मारले गेले, किती होरपळले, किती संसार उघड्यावर आले याचा नंतर हिंदुत्ववादी नेतेही विचार करणार नाहीत आणि ओवेसींसारखे मुस्लिम नेतेही. उलट याच दंगलींचे भूत पुढच्या निवडणुकांना या दोन्ही बाजूंना कामी येईल. पण भाजपा आणि एमआयएम यांच्यातील ही नुरा कुस्ती आहे, मतांसाठी कावळ्यांचा गलबला सुरू झाला आहे हे बहुतेक लोकांच्या ध्यानी येत नाही. याच कोलाहलात भावना भडकवल्या जातात, आवेशपूर्ण भाषणे होतात आणि मते मिळवली जातात. हिंदुचे कैवारी म्हणवणारे राजकारणी आणि मुस्लिमांचे तारणहार म्हणवणारे पक्ष यांच्यातील ही पूर्वनियोजित नुरा कुस्ती आहे. विषय राम मंदिराचा आहे. जसे शिवस्मारक राहिलेय, महामानव आंबेडकरांचे स्मारक व्हायचे आहे तसेच राम मंदिरही निवडणुकांमध्ये धार्मिक भावना भडकवण्यापुरता वापरला जाणारा विषय आहे. राजकीय पक्ष याच विषयावर नुरा कुस्ती खेळून मतांचे विभाजन करून सत्तेची उब मिळवतील पण ही उब देण्यासाठी गरीबांची घरे धडधडून पेटवली जातील हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. अध्यादेश आणा आणि राम मंदिर बांधा ही मागणीही मतांच्या विभाजनासाठीच आहे आणि अध्यादेश आणून दाखवाच, हे आव्हानही नुरा कुस्तीतीलच आहे. रामजन्मभूमीचे घोंगडे सर्वोच्च न्यायालयात भिजत राहिलेलेच संबंधित राजकीय पक्षांना फायद्याचे आहे. यामुळेच त्यांना हिंदू आणि मुस्लिम यांच्या भावना चिथावणारी प्रक्षोभक वक्तव्ये सुरू ठेवता येतील. राम मंदिर उभारले जाईल की नाही हे या क्षणाला कुणालाच सांगता येणार नाही. भाजपा तर ते बांधणार नाही असे शिवसेनेचेच म्हणणे आहे. यासाठीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नोव्हेंबरच्या अखेरीस अयोध्येत जाणार आहेत. आता शिवसेनाही एकला चालो रे या भूमिकेचे शिवधनुष्य पेलण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे हिंदुत्वासाठी एकवटणार्‍या मतांमध्ये त्यांनाही वाटा हवा आहे. उद्धव ठाकरे यांची राम मंदिराविषयीची अलिकडची वक्तव्ये, भाजपाला दिलेले आव्हान हे सारे खेळ यासाठीच आहेत. लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठीही जानेवारी महिना निवडला आहे. या सुनावणीत न्यायालयाने काहीही सांगितले तरी हंगाम निवडणुकांचा असेल. त्यामुळे शिवसेनाही महाराष्ट्रातील सत्तेसाठी आखाड्यात उतरू शकते. भाजपा आणि कथित हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, एमआयएम यांच्यात जर नुरा कुस्त्या रंगल्या तर काँग्रेस आणि इतर पक्षही मागे राहाणार नाहीत. या सगळ्या खडाखडीत मागे लोटले जातील ते फक्त लोकांचे खरेखुरे प्रश्न.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support