This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

हरिश्चंद्रगड, एक अविस्मरणीय ट्रेक!! हरिश्चंद्रगड, हे नाव जरी ऐकले तरी सह्याद्रीत भटकंती करणार्‍याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, एक स्फूर्ती मिळते. प्रत्येक सह्याद्री वेडा या गडावर भ्रमंती (ट्रेकिंग) करण्याची मनिषा बाळगून असतो. या गडाला ‘ट्रेकर्सची पंढरी’ असे देखील संबोधले जाते. तर मित्रांनो, या गडाचा इतिहास वाचून आणि अनेक ट्रेकर्सचे अनुभव ऐकून या गडाला आपण एकदा तरी भेट घ्यायचीच अशी अनिवार इच्छा निर्माण झाली. त्यासाठी मी तयारी सुरू केली होती. पण ही इच्छा पूर्ण होण्याचा दुग्धशर्करा योग इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. कारण ‘आमची वसई ट्रेकर्स’ आणि ‘सावे टूर्स आणि ट्रॅव्हल्स’ यांच्या संयुक्त आयोजनाखाली आणि अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखाली हरिश्चंद्रगड, जगप्रसिद्ध कोकणकडा, आणि अतिशय मनमोहक असा भंडारदरा येथील काजवा महोत्सव असा रात्रीचा ट्रेक आयोजित केला होता. त्याची सूचना व्हॉट्सअ‍ॅप्पवर मिळाली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. दिवस ठरला 2 जून 2018. मित्रांनो, या गडाचा इतिहास खूप रंजक आहे तो बघूया, हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. 
आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. या हरिशचंद्र गडाला ऐतिहासिक महत्व देखील आहे ते असे की, महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर ही या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच आदिवासी समाजाचा निकारीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणार्‍या लढ्याचे हे प्रतिक आहे.1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून  घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. तर मित्रांनो, असा हा ऐतिहासिक, पौराणिक आणि भौगोलिक महत्व लाभलेला किल्ला आता आम्ही सर करणार होतो म्हणून सगळे उत्सुक होते. 2 जूनची संध्याकाळ! आम्ही या गडावर जाण्यासाठी पाचनई गावातील मार्ग निवडला होता. त्यासाठी दोन ठिकाणांहून सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. थेट वसईहुन बसने येणारी मंडळी भंडारदरा काजवा महोत्सव करून पाचनई गावात आम्हाला मिळणार होती. आम्ही सावे टूर्स सोबत येणार असल्याने संध्याकाळी 6:25 ची कसारा लोकल पकडली. शनिवार असल्याने बर्‍याच जणांना रजा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसमधून निघून भराभर ती लोकल गाठण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालली होती. त्या ट्रेकर्स मंडळींपैकीच मी एक. अर्धा तास प्रतीक्षा करून थकल्यावर अखेर त्या लोकलमध्ये चढण्यास मला यश मिळाले. अक्षरशः जागा मिळेल तिकडे घुसत उभा राहिल्यावर निश्वास सोडला आणि पुढील प्रवास कसा असेल याचा विचार करत राहिलो. लोकलने काही अंतर पार केले तोच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि माझी तंद्री भंग पावली. मी बाहेर बघितले. अतिशय सुंदर संधीप्रकाश पडला होता. पावसाच्या टपोर्‍या धारा तप्त जमिनीवर कोसळत होत्या. त्यामुळे येणारा सुगंध केवळ अवर्णनीय.  तो अनुभवलाच पाहिजे. वातावरणात लगेच बदल होऊन थंडगार झाले. कसार्‍यापर्यंत निसर्गाचा हा खेळ सुरू होता. या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्याच्या नादात कसारा स्टेशन कधी आले कळले देखील नाही. अखेर आम्ही स्टेशनवर एकत्र जमलो. सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता, तसे पाहता सगळेच नवीन होते एकमेकांना. पण एकदम आपुलकीने सर्वांची विचारपूस करत होते. इतक्यात शिट्टी वाजली आणि सूचना मिळाली की बरोबर अर्ध्या तासात आपण पाचनई गावाकडे प्रस्थान करणार आहोत, तरी सर्वांनी आणलेले रात्रीचे जेवण करून घेणे. आम्ही तत्परतेने जेवण उरकून पुढील सूचना मिळण्याची प्रतीक्षा करू लागलो. अपेक्षेप्रमाणे आम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही. निघायची सूचनावजा शिट्टी वाजली आणि आम्ही ट्रेक दरम्यानच्या सूचना आणि हजेरीसाठी गोलाकार उभे राहिलो. 15 मिनिटात सर्व सूचना समजून घेऊन आम्ही शिस्तीत स्टेशनच्या बाहेर पडलो. कसारा स्टेशनहून खाजगी वाहनाने पाचनई गावात जावे लागते त्यामुळे आम्ही पटापट जागा मिळवण्यासाठी त्या जीप मध्ये जाऊन बसलो. सर्व जण बसल्यावर  छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करून आणि गणपती गजाननाचे चिंतन करून प्रवासास सुरुवात केली. अंताक्षरी सुरू झाल्या, जीपमधील गाणी देखील वाजवून झाली. मग थोडेसे पेंगुळलेले डोळे एक झोप काढून ताजेतवाने केले. मजल दरमजल करीत अंदाजे 2 वाजेपर्यंत आम्ही पाचनई गावात प्रवेश केला. वातावरणात चांगलाच गारठा जाणवत होता. पण तो अतिशय आल्हाददायक वाटत होता. हातपाय मोकळे करण्यासाठी आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. त्याच क्षणी आमची नजर उंचच उंच पसरलेल्या डोंगर रांगांवर पडली. अंधार जरी असला तरीदेखील अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे तो अनुभव सुंदर होता. इकडे एका बाजूला झाडांवर काजवे चमकत होते. त्यामुळे ती झाडे दिवाळीत रोषणाई केल्याप्रमाणे दिसत होती. ते दृश्य पाहून आम्ही भंडारदरा येथील महोत्सवातील क्षण मिस केले त्याचे दुःख झाले नाही. त्या वातावरणात गप्पा मारत असताना सुचनेची शिट्टी वाजली आणि सर्वजण (आमची वसई आणि सावे टूर्स) गोलाकार उभे राहिले. आवश्यक त्या सूचना गावकर्‍यांच्या सांगण्याप्रमाणे देण्यात आल्या आणि आम्ही ठीक पहाटे 3 वाजता ट्रेकला सुरुवात केली.
सुरुवातीची वाट ही थोडी दाट झाडीतून जाते त्यामुळे जास्त टॉर्चचा उजेड न करता आम्ही चढत होतो कारण पाखरे अंगावर बसून चढण्यात अडथळे आणत होती. थोडी सपाटी आल्यावर आम्ही थोडा आराम केला. त्या ठिकाणी बेडकांचे डराव डराव ऐकायला मिळाले आणि कान तृप्त झाले. आमच्यापैकी काही हौशी छायाचित्रकारांनी त्याचे फोटो देखील काढले. सर्व जण एकामागोमाग आल्याची खात्री पटताच आम्ही पुढे कूच सुरू केली. आता थोडी वाट बिकट होत जाते. चढाईला पायर्‍या जरी असल्या तरी दमछाक होत होती. वातावरणात सुखद गारवा असल्याने तेवढी दमछाक झाली नाही. मजल दरमजल करत आणि गप्पा मारत आम्ही एक अजून मोकळ्या भागात येऊन पोचलो. या वेळेपर्यंत बरेचसे अंधुक दिसायला लागले होते. डोंगर रांगांमधून दिसणार्‍या ढगांचे दृश्य फारच मनमोहक होते. तिथे जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. आता वाट सोपी होतीस, पण चढण बरीच होती. तरी पण न डगमगता ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चढत होतो. अखेरीस ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे मंदिरे दिसू लागली. आणि आमचे पाय आमच्याही नकळत भराभर मंदिराच्या दिशेने पडू लागले. मंदिराच्या आसपासचा भाग चांगले उजडल्याने अतिशय सुंदर दिसत होता. तो नजरेखालून घातला आणि मंदिरात गेलो. शंकराला मनोभावे नमस्कार केला. तिथेच पिण्याच्या पाण्याचा साठा आहे त्यातून पाणी भरून घेतले.. आणि जरा विसावलो. फोटोग्राफी केली आणि इतक्यात पुन्हा खुणेची शिट्टी वाजली. सूचना मिळाली की इथे जास्त वेळ न घालवता कोकणकड्यावर पोचायला हवे सुर्योदय बघण्यासाठी! मग आम्ही कोकणकड्याकडे मार्गस्थ झालो. ही वाट तशी साधारण दमछाक करणारी होती. मध्येच चढ, मध्येच उतार, अंदाजे दीड तासांची पायपीट केल्यावर आम्ही कोकणकड्याच्या अगदी जवळ येऊन पोचलो. समोरून दिसणारे दृश्य पाहून भान हरपून गेले आणि आपोआप आमचे पाय त्या कड्याकडे जाऊ लागले. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे हे कोकणकड्याचे रूप पाहून आम्ही हर्षयुक्त चेहर्‍याने एकमेकांकडे पाहू लागलो. अशातच इंद्रवज्र ज्याला म्हणतात तो क्षण आमचे डोळे तृप्त करून गेला. ती दृश्ये डोळ्यात तर साठवली पण जास्तीत जास्त आपल्या कॅमेर्‍यात साठवायचे प्रयत्न करू लागलो. थोडा आराम केल्यावर सूचना मिळाली की तारामती शिखरावर येण्यास कोण कोण उत्सुक आहेत, त्यांनी एक बाजूला या. ही सूचना ऐकली आणि आमचे पाय एक वेगळ्याच थ्रिल करायला मिळणार म्हणून तयार झाले. 45 जणांचा ताफा तारामती शिखर चढण्यास सज्ज झाला आणि आम्ही चढाई सुरू केली. ही वाट जरा चांगलीच दमछाक करणारी होती. अंदाजे 1 तासांची पायपीट केल्यावर एक ‘रामभरोसे’ म्हणता येईल अशी शिडी आली आणि आम्ही सगळे चांगलेच घाबरलो मनातून, कारण जर एकही चूक झाली तर कपाळमोक्ष ठरलेला होता. पण ती देखील सुखरूप पणे पार केली आणि आमच्या जीवात जीव आला. येथून पुढील चढाई कठीण होती, पण एकमेकांच्या साथीने आम्ही तारामती शिखरावर पाऊल ठेवले तेव्हा सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच विजयाचा आनंद चमकत होता! या शिखरावरून कोकणकड्याचे रौद्र, विलोभनीय असे रूप पाहायला मिळते. तसेच कळसुबाई शिखर, रतनगड, माळशेज घाट, MTDC चे धरण आणि पाण्याचा परिसर  याचे देखील दर्शन होते. थोडा वेळ तिथे बसून फोटो काढून विश्रांती घेतली आणि परतीच्या मार्गाला लागलो. या संपूर्ण प्रवासात एक कुत्र्याने आम्हाला खूप साथ दिली. ज्या ठिकाणी आम्ही वाट चुकण्याचा संभव होता, त्या ठिकाणी त्याच्या मागे जात असल्यामुळे योग्य मार्ग सापडला आणि आम्ही सुखरूप कोकणकड्यावर आलो. कोकणकड्यावर आल्यावर  हॉटेल कोकणकडा येथील चविष्ट असे कांदेपोहे आणि चहा यांचा आस्वाद घेतल्यावर थकवा कुठच्याकुठे पळून गेला. मग काही वेळ त्या निसर्गाच्या सानिध्यात घालवून आम्ही परतीची वाट धरली. उतरताना आम्हाला विशेष असा त्रास झाला नाही तरीदेखील उन्हाच्या झळा काही स्वस्थ बसू देत नव्हत्या. मध्ये मध्ये थांबून आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारात जमलो. या वेळपर्यंत आमच्याकडचे बहुतेक पाणी संपले होते, त्यामुळे पुन्हा त्या मंदिरातून  थंडगार पाणी भरून घेऊन निवांत बसलो. या वेळी आम्हाला गडाबाबत माहिती सांगण्यात आली. त्या नंतर आम्ही गुहेतील शिवलिंग बघण्यासाठी गेलो..त्या ठिकाणी पाण्यात उतरून मनोभावे नमस्कार केला आणि पुन्हा मूळ मंदिराच्या आवारात जमलो. एक मोठा ग्रुप फोटो काढून गड उतरायला सुरुवात केली. गप्पा मारत आणि आठवणींना उजाळा देत केव्हा आम्ही गड उतरलो आम्हाला देखील कळले नाही. परंतु उन्हाच्या झळा आपले काम चोख बजावत होत्या. प्रत्येकाच्या पोटात भुकेने कावळे कोकलत होते. अखेरीस आम्ही पायथ्याशी आमच्या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या तिथे आलो. त्या समोरील घरात आमची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. चुलीवरील चविष्ट अशी बाजरीची भाकरी, चण्याची उसळ, आमटी भात असा फक्कड मेनू जेवणात होता तसेच काही जण मांसाहारी होते त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा मांसाहार केला होता त्यावर सडकून भूक लागलेली असल्याने ताव मारला आणि भरलेल्या पोटाने तृप्तीची ढेकर देऊन गाडीत येऊन बसलो. गाडीत बसल्या नंतर थोडा ट्रेकचा अंमल दिसायला लागला आणि आम्ही झोपून गेलो. कसारा स्टेशनला आल्यावर प्रत्येकाने पुढील ट्रेकला भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घेतला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support