This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

पुतळ्यांचे राजकारण समजून घ्यायला हवे!

स्वातंत्र्यसंग्रमातील नेतृत्त्व आणि भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे नव्हे जगातील सर्वात उंच पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकार्पण केले. हा स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी 982 मीटर्स इतका उंच आहे. सरदार पटेलांच्या उंचीएवढा हा उत्तुंग पुतळा आहे, असे या लोकार्पणानिमित्ताने सरकारने दिलेल्या पानभर जाहिरातींमधील एक वाक्य आहे. ही जाहिरात पटेलांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान सांगते आणि इतरही बर्‍याच गोष्टींचा उल्लेख करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक छान हसरा फोटोही जाहिरातीत आहे. पण एक गोष्ट या जाहिरातीने सांगितलेली नाही. ती म्हणजे, भारताच्या या दिवंगत पोलादी पुरुषाच्या पुतळ्याचे लोकार्पण विद्यमान कणखर पोलादी पुरुषाने, नेतृत्त्वाने केले आहे. मोदी यांचा कणखर बाणा अवघ्या जगाने पाहिला आहे आणि चीन, पाकिस्तान दररोज अनुभवतो आहे. पटेल यांच्याच विचारांच्या मुशीत तयार झालेले मोदी यांचे पोलादी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली. त्यात बदल नाही. प्रारंभी या पुतळ्याला किती विरोध झाला होता, किती टिका झाली होती. पण मोदी ठाम राहिले. पुतळा उभारणारच. होऊ दे खर्च. आता याला कुणी तरी हे गुजरातमधील पटेल समाजाला चुचकारण्याचे राजकारण असेही समजेल. पण त्यात काही अर्थ नाही. एवढे मोठे कार्य साकारल्यावर खुल्या दिलाने कौतुक करायचे सोडून लोक काय वाट्टेल ते बोलतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही मोदीसाहेब. तुम्ही लोकार्पण प्रसंगी छत्रपती शिवरायांचा उल्लेख केलात. भाजपाचीच स्थिर सत्ता असलेल्या शेजारच्याच महाराष्ट्रात जन्मलेले शिवराय हे एक स्फूर्तीदायक असे नररत्न. त्यांचे स्मारक काही होता होईना आणि पटेलांचा पुतळा मात्र झालाही, असे तुम्हाला कुणी विचारले तर तुम्ही हसून सोडून द्या. नितीनभौ गडकरी नाहीतरी या आश्वासनांबद्दल आणि हसून पुढे जाण्याबद्दल मागे काहीतरी बोलले आहेतच. आम्ही समजून घेऊ. आम्ही हेही समजून घेऊ की पटेलांचा पुतळा ही एक राजकीय गरज होती. शिवरायांचे आणि घटनाकार भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात प्रारंभीच घेऊन शाब्दीक आदर व्यक्त केला तरी पुरते. महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार असले तरी विद्यमान सरकारच्या कारकीर्दीत या स्मारकांची एक वीटही उभी राहिलेली नाही. आम्ही हेही समजतो की, अरबी समुद्रात उभे राहाणार असलेले शिवछत्रपतींचे स्मारक आणि इंदू मिलच्या जागेवरील डॉ. आंबेडकरांचे स्मारक या दोन्ही बाबी मतांसाठी पुरवून वापरायच्या आहेत. प्रत्यक्ष स्मारक भाजपाच्याच सरकारने उभे करायला हवे असे काहीही नाही. कदाचित या दोन्ही राष्ट्रपुरुषांची स्मारके उभीही राहाणार नाहीत, हेही आमचा महाराष्ट्र समजून घेऊ शकतो. पटेल यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जी पाटी लावण्यात आली आहे त्यात फ्रेंच, जपानी, चिनी भाषेपासून देशांतील सर्व भाषांत स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिले आहे. पण मराठीला तेथे स्थान नाही. फक्त आमची मायमराठीच या पाटीवर विराजमान नाही. मराठीबद्दलचा हा आकसही आपल्याला समजून घ्यायला हवा. शेवटी देश एकसंध ठेवायचा आहे. त्यामुळेच तर बुलेट ट्रेन प्रकल्प आपल्या शेतकर्‍यांच्या जमीनी गिंळकृत करत असताना, खर्चाचा मोठा वाटा राज्याला उचलायला लागत असताना आपण गप्प आहोत. अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असताना आपण गप्प आहोत. महत्त्वाची आर्थिक आणि सरकारी केंद्रे गुजरातकडे गेली तरीही आपण गप्प आहोत. हे पुतळ्यांचे राजकारण फक्त आणि फक्त मतांसाठीच सुरू आहे हे जाणूनही सर्व गप्प आहेत. नाहीतर ज्या पटेलांचे नावही आजवर भाजपाकडून कधी घेतले गेले नव्हते ते पटेल अचानक नव्या सत्ताकाळात वंदनीय कसे झाले? याचे उत्तर पुन्हा मतपेटीकडेच आणून सोडेल. भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार पटेल यांचा पुतळे उभारण्याला कायम विरोध होता. हे फार जणांना माहिती नाही. महाराष्ट्र दिनमान ने बुधवारच्याच पहिल्या पानावर एक बातमी छापून हा विरोधभास समोर आणला होता. उपलब्ध माहितीनुसार, महात्मा गांधींच्या हत्येनंतर बरोबर दोन आठवड्यांनी म्हणजे 14 फेब्रुवारी 1948 रोजी पटेल यांनी ‘दु:ख करत बसणे पुरे झाले आता कामाला लागा’ अशा मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात, ‘गांधीजींच्या नावाने मंदिर बांधणे किंवा त्यांची मूर्तीपूजा करणारी स्मारके बांधण्याला माझा सक्त विरोध आहे. अशा प्रकरणांमध्ये मी कायमच माझी मते स्पष्टपणे मांडली आहेत. अशी स्मारके बांधणार्‍यांना किंवा तसा विचार करणार्‍यांना असे न करण्याचा सल्ला मी देईन. त्यांनी अशाप्रकारे स्मारके बांधण्याचे काम करु नये अशी विनंती मी त्यांना करतो’ असे म्हटले होते. स्मारके, पुतळे याना ज्या द्रष्ट्या पटेलांनी विरोध केला त्यांचेच स्मारक केवळ राजकारणासाठी बांधण्यात आले. जगातील सर्वात उंच वगैरे मिरवणे भारतासारख्या गरीबीचा प्रश्न, अर्धपोटी आणि भुकेल्या जनतेचा प्रश्न अद्याप सोडवू न शकलेल्या देशाला शोभून दिसत नाही. या पुतळ्यासाठी 2 हजार 290 कोटी रुपये खर्ची पडले आहेत. अशा भरभक्कम निधीअभावी अनेक जनकल्याणकारी योजना सरकारने गुंडाळून ठेवल्या आहेत, अर्धवट आहेत. या योजनांपैकी अनेक योजना यातून सुरू तरी होऊ शकल्या असत्या. याच खर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपाला फटकारले आहे. ‘अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना !’, अशी कळकळ जणू सरदार वल्लभभाई पटेल व्यक्त करत असल्याचे त्यांनी व्यंगचित्रातून मांडले होते. जी गोष्ट पटेलांच्या स्मारकाची तीच आपल्याकडे कधी काळी होणार्‍या शिवराय आणि आंबेडकरांच्या स्मारकांची. या लोकोत्तर व्यक्तीमत्त्वांना जनतेच्या कल्याणाची चाड होती. त्यांच्याच काय आणखी कुठल्याही व्यक्तीचे पुतळे वा स्मारके उभारण्याऐवजी हाच काही हजार कोटींचा पैसा आपला देश लोककल्याणासाठी, चांगल्या योजनांसाठी उपयोगात आणू शकतो. पण ते तसे होणार नाही. राजकीय पक्षांना पुतळ्यांचेच राजकारण अधिक फायद्याचे आहे हे आपण समजून घ्यायला हवे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support