Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, December 8, 2018

संविधान दिनाचा संकल्प जातपुरुषी भाषा न वापरण्याचा!

संविधान दिनाचा संकल्प  जातपुरुषी भाषा न वापरण्याचा!

भाषा हा मानवी संस्कृती-विकासातील एक महत्वाचा भाग आहे. नागरी समाजात माणूस आपल्या भावभावना आणि विचार प्रामुख्याने भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू लागला. भाषा या अर्थानेही दैवी देणं वगैरे काही नाही. ती मानवी विकासात गरजेनुसार तयार होत गेली आहे. मानवी समुदाय हजारो वर्षे एखाद्या भूभागावर वास्तव्य करतो, भाषेच्या माध्यमातून संवाद करतो, हजारो वर्षांपासूनच्या भाषेबद्दल त्याला ममत्व निर्माण होते. भाषा अस्मितेचा भाग बनत जाते.
भाषा जशी संवादाचे माध्यम म्हणून आली असली तरी भाषा ही वर्चस्वाचे साधन म्हणून हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. खरे तर भाषा ही फक्त संवादाचे साधन असते. परंतु कोणत्याच समाजात ती फक्त संवादाचे माध्यम म्हणून वापरली जात नाही. सत्तेच्या बळकटी करणासाठी तिचा वापर केला जाताना दिसतो. सत्ता ही फक्त राजकीयच सत्ताच नसते. सत्ता आणि सत्तासंबंध मानवी जीवनात सर्वक्षेत्रात अढळतात, कुटुंबसंस्थेपासून सार्वजनिक क्षेत्रात याचा अनुभव येतो. सत्ता याचा अर्थ पदसोपानात्मक संरचना जिच्या टोकापासून पायापर्यंत अनेक स्तर असतात. सर्वोच्य स्थानावर असणारी व्यक्ती, व्यक्तींचा गट, समुह, वर्ग, जाती हे भाषेचा वापर आपल्या हितसंबंधासाठी करताना दिसतात.
भाषेला स्वत:चा एक इतिहास आहे. विशिष्ठ समाज विकासाच्या टप्प्यावर तिच्यात भर पडत गेली; तिचा विकास होत गेलेला दिसतो. भारतासारख्या जात-पुरुषसत्ताक समाजात भाषा ही ‘दैवी देण’ असल्याचा सिध्दांत मांडला गेला. अशा मांडणीतही हितसंबंधी राजकारण होते. भाषा ‘दैवी’ म्हंटली गेली की तिच्या निर्मितीचे श्रेय माणसाकडून हिरावले जाते. सामान्य जनांनी निसर्गाशी झगडा करत, उत्पादक श्रम करत भाषेचा विकास केला याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. स्त्रीसत्तेच्या कालखंडात शेती आणि तिचे वाटप करताना निर्ऋतीसम अनेक गणमुख्या गायन करीत होत्रा. शेतीचे मंत्र म्हणत होत्रा. शेतीप्रमाणेच भाषा, साहित्य -संस्कृतीच्या जनक स्त्रिया होत्या . पण या इतिहासाला नाकारत ‘भाषा दैवी देण‘ हा सिध्दांत मांडला गेला. देवांनी भाषा निर्माण केली आणि देवांचे भूतलावरील प्रतिनिधी-भूदेव म्हणजे ब्राह्मण! ब्राह्मण हे भाषेचे निर्माते व वाहक ठरविले गेले. इतकेच नाही तर सर्व तत्त्वज्ञानांचे जनकही! समाजातील पदसोपान रचनेतील 
सर्वोच्चस्थानी असणारे म्हणून ब्राह्मणच ठरविले गेले.
आपल्याकडे स्त्रीसत्ताक समाजात स्त्रिया कृषिमायेचे मंत्र म्हणतात ‘मी राष्ट्रीय आहे’ असे म्हणत होत्या. परंतु पुरुसत्ताक-दासप्रथाक समाजात ही भाषा बाजूला सारुन ‘सृष्टीचा निर्माता मी आहे’ अशा पुरुषसत्ताक भाषेलाही सुरुवात झाली. उत्तोरोत्तर भाषा अधिकाधिक जात-पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना दुय्यम लेखणारी, त्यांचा अवमान करणारी, त्यांच्या शरिरावर यांची विटंबना करणारी भाषा वापरली जाते.
‘भित्री बागूबाई,’ ‘गाढवीच्या’, ‘हातात बांगड्या भर’ ‘पुरुषभर उंचीचे’ अशा भाषा वापरातून स्त्रिया दुय्यम, दुबळ्या, हळव्या, अबला आणि पुरुष बलवान, श्रेष्ठ असे विभाजन केले जाते. ‘तो’ आणि ‘ती’ यांच्यातील विषम नाते, सत्तात्मक नाते भाषेच्या माध्यमातून व्यक्त केले जाते. सर्व शिव्या ह्या स्त्रीयोनीशी, संबंधीत किंवा स्त्रियांची मानहानी करणार्या आहेत. या भाषेचा वापर नेहमी शिव्यांमधूनच होतो असे नाही. बोली व प्रमाण भाषेतही याचा मोठा वापर केला जातो.
स्त्री-पुरुषांचे लिंगगुणोत्तराचे प्रमाण दिवसेंदिवस चिंताजनक होत चालले आहे. त्यामागे जात-पितृसत्ताक मानसिकता काम करते. ‘वंशाला दिवा हवा’ या भाषेत त्याचे समर्थन पुढे येत रहाते. ‘वंशाला दिवा हवा’ आणि ‘कन्या दान’ करायला मुलगी हवी. कन्येचे ‘दान‘ ही भाषा पुरुषसत्ताक मनोवृत्तीतून रेते. ‘बाईच्या जातीनं.‘ कसे वागावे ही भाषा समाजात पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट करत रहाते. ह्या भाषेचा वापर अगदी शासन पातळीवर ही सर्रासपणे केला जातो. स्त्रिया ह्या ‘उपयुक्त वस्तू’ आहेत असा संदेश जाणार्‍या जाहिराती  महाराष्ट्र शासनानेही केल्या होत्या. ‘आपल्या मुलाला सून हवी असेल तर स्त्रीभ्रुणहत्या करु नका‘ ‘भावाला राखी बांधायला बहिण हवी म्हणून स्त्रीभ्रुण हत्या करु नका’ ही भाषा स्त्रियांकडे बघण्याचा भोगवादी-उपयुक्तवादी दृष्टिकोन आधोरेखित करते. ‘ती‘ ची ओळख व अस्तित्व फक्त सून, मुलगी, बायको म्हणूनच असायला हवे असा विचार त्यातून बळकट केला जातो. एखाद्या स्त्री कोणाची बायको, सून नसेल, ती अपत्यनिर्मिती कराणार नसेल तरी तिला फक्त एक स्त्री म्हणून-बाई म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही? पण याचा विचार अशा जाहिराती करत नाहीत. आशाच जाहिराती मध्ये ‘कन्यारत्न’  अशा शब्द वापरला गेला. एखाद्या बाईला ’रत्न’ म्हंटले गेले की, रत्नाची जागा ‘कोंदणात’च असते. त्या ‘रत्नाला’ सांभाळ्याची. संरक्षणाची, त्यावर मालकी असण्याची भानगड सुरु होते. आम्हाला उपयुक्त पशू म्हणूनही जगायच नाही आणि कोंदणात, संरक्षित वस्तू म्हणूनही जगायच नाही असे म्हणणारे आवाज दाबुन टाकले जातात. ते बुलंद झाले पाहिजेत.
निपुत्रिकांना संतान प्राप्त करुन देणार - अशी जाहिरात करणार्या केंद्राच्या विरुध्द कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता. कारण अशा केंद्राकडून ‘वंशाचा दिवा’, ‘अंगणात बाळकृष्ण खेळेल‘ अशा शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या वाक्यांमधून पुरषसत्ताक भाषेचा उघड उघडपणे पुरस्कार केला जात असतो. यातून लिंग निवड करुन पुरुष लिंगच जन्माला घातले जाईल असा अर्थ आहे. पण आता न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ‘वंशाचा दिवा’ असे म्हणाल तर जेल मध्ये जाल असा त्याचा अर्थ आहे.
केंद्र सरकार हे ‘डेज’ साजरे करणारे इव्हेंटमॅनेजमेंट सरकार आहे. ‘स्वच्छता दिन’, ‘योग दिन’ करत करत आता प्रवास ‘रक्षाबंधन दिना’ कडे सुरु झाला आहे. ‘रक्षाबंधन’ सण ही स्त्रियाच्या दुय्यमत्त्वाशी संबंधित आहे. मूळात ‘बंधनांचा’ उत्सव असू शकतो का? भारतात तो आहे. अशा दिवसाच्या साजरीकरणातून आपण स्त्रियांना आणखीनच ‘दीन’ ठरवणार आहोत. भाऊ-बहिण नात्याचे अशा उत्सवातून उदात्तीकरण करायचे आणि बहिणीला संपत्तीत वाटा देण्याची वेळ आली की ‘चोळी- बांगडी’ वर तिची बोळवण करायची. ‘हक्क सोड पत्र’ लिहून घ्यायची हा दुटप्पी व्यवहार आहे; नव्हे हाच खरा पुरुषसत्ताक व्यवहार आहे! ‘रक्षा बंधन दिन’ साजराच करण्याऐवजी ‘हक्कसोड पत्रांना’ बंदी करण्याची मोहिम हाती घेत लाडक्या बहिणीला संपत्तीत वाटा द्यायला सुरुवात करुयात. प्रश्न पुरुसत्ताक भाषेप्रमाणेच व्यवस्थेचाही आहे. भाषेतील समतावादाने सुरुवात करुन आपण एकंदर सम्यक समताधिष्ठित समाजाकडे वाटचाल केली पाहिजे.
भाषा वापराबाबत समतावाद्यांनी गंभीरच असायला हवे. आपण ज्या महामानवांच्या विचारांना मानतो त्यांनीही भाषेबद्दल अत्यंत गांभीर्राने विचार केलेला दिसतो. किंबहूना आपण ज्या विचारांना मन:पूर्वक स्वीकारतो तेव्हा त्या विचारांवर आधारित भाषा वापरही होतो; झालाच पाहिजे. नाहीतर मी स्त्रीवादी विचारसरणीचा आहे आणि स्त्रिया उपजत अबला, नाजूक, दुय्यम असतात अशी भाषा वापरणे चुकीचे ठरते. आईमायीवरुन शिव्या देणे स्त्रीवादी विचारात बसत नाही. चळवळीतही स्त्रीवादाचा पुरस्कार करत गेल्याने अनेक घोषणांमध्ये, गाण्यांमध्ये, वर्तनामध्ये इ. बदल होत गेले आहेत. हिंदु मुस्लिम सीख इसाई, हम सब भाई भाई घोषणा आता हिंदु मुस्लिम सीख इसाई, हम सब बहने-हम सब भाई अशी बनली आहे.
19 व्या शतकात म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक स्त्रीवादाची पाराभरणी केली. त्यांनी असंख्य ग्रंथ लिहिले. उत्तरोत्तर तांच्या लिखाणात सत्यशोधकी स्त्रीवादी परिभाषचा स्वीकार दिसून येतो. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातील भाषा हे यातील उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. ’एकंदर सर्व स्त्रीपुरुष’, मायबाप सरकार अशी भाषा दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. त्यांना  घटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो. 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. संविधान दिन साजरा करताना यातील स्त्री-पुरुष समानतेच्या भाषेचाही विसर पडू देता कामा नये. संविधान भारतातील सर्व नागरिकांना, (ज्यात  स्त्रियांचाही समावेश करण्यात आला आहे) सन्मानाने जगण्याचा हक्क देते, मूलभूत हक्क प्रदान करते. या कलमांची भाषा लक्षपूर्वक अभ्यासली तर देशात संचार स्वातंत्र्य आहे हा आणि इतर हक्क स्पष्ट करताना जात, धर्म, वंश, प्रदेश, लिंग यामुळे भेदाभेद केला जाणार नाही हे सांगितले गेले आहे. महत्वाचे म्हणजे यात लिंगावर आधारित भेदाभेद केला जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. महामानवांचा विचार त्यांच्या भाषा वापरासह, समन्यायी भाषेसह आत्मसात करण्याचा कष्टसाध्य प्रयत्न करण्याचा संकल्प संविधान दिनानिमित्त निर्ऋतीच्या वारसदारांनी केला पाहिजे!
(लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.)
(साभार : राईटअँगल्स.इन)
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support